General Health
ती फक्त डॉक्टर नव्हती...
ती फक्त डॉक्टर नव्हती...
राजकीय वरदहस्त असलेले स्थानिक गुंड, दबावाखाली वागणारे पोलीस, आणि सगळं माहित असूनही शांत राहणारी वरिष्ठ यंत्रणा.
या सगळ्यांच्या बेफिकीरीचा बळी ठरली ती फलटण उपजिल्हा रुग्णालयातील आपली डॉक्टर बहीण.
ही फक्त एका डॉक्टरवर झालेली दुर्घटना नाही, हे एका समाजाच्या संवेदनाशून्यतेचं दुःखद प्रदर्शन आहे.
लोकांना कदाचित हे कधीच उमगणार नाही की एका ग्रामीण कुटुंबातील मुलगी डॉक्टर होण्यासाठी किती संघर्ष करते.
आई-वडिलांचा संघर्ष, वर्षानुवर्षांचे कष्ट / अभ्यास, आणि शेवटी, ज्या समाजासाठी ती लढते, तोच समाज तिचं संरक्षण करू शकत नाही.
आता हे फक्त “कायद्याचं प्रकरण” नाही. ही मूल्यांची उध्वस्त झालेली इमारत आहे, जिचा पाया आपणच हलवला आहे… रोज थोडं थोडं असंवेदनशील होऊन, दुसऱ्याच्या वेदनेकडे डोळेझाक करून.
आज ती डॉक्टर आहे, उद्या कुणीतरी शिक्षिका असेल, परवा एखादी परिचारिका, सरकारी अधिकारी आणि त्यानंतर कदाचित तुमच्याच घरातील कोणी.
जेव्हा सेवा देणारे खचतात, तेव्हा समाजही कोसळतो. कारण समाजाचं आरोग्य फक्त औषधांनी नव्हे, तर माणूसपणाने टिकतं.
फरक एवढाच आहे, ती आपलं काम करत होती, आणि काही जण आपली सत्ता दाखवत होते.
इतकं सोपं आहे का कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त करणं? आणि त्याहून सोपं, ते करून मोकळं फिरणं.
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts