Lifestyle
भीमाशंकरजवळच्या गावातील साधी स्त्री
ती भीमाशंकरजवळच्या गावातील साधी स्त्री आहे, वय अंदाजे साठ, एकटीच एका छोट्या खेड्यात राहते.
तिचा मुलगा पुण्यात आहे पण व्यस्त असल्यामुळे तिला डॉक्टरकडे सोबत घेऊन जाण्याचा वेळ नाही. म्हणून ती एकटीच येते—एसटीने, शेवटचा jeep, मग पायपीट.
गेल्या १० वर्षांपासून ती वेळेवर तपासणी, औषधं, फाईल्स, जुन्या नोंदी घेऊन येते—फक्त रूग्ण म्हणून नव्हे तर एक जबाबदार माणूस म्हणून.
ती ग्रामीण जीवन जगते, पण त्यातही शिस्त आणि स्वाभिमान आहे. ती कधी काही मागत नाही, फक्त समजून घेते.
पण या वेळेस उशीर झाला. तिचे रिपोर्ट्स थोडे बिघडले होते, साखर वाढलेली होती. ती शांत होती पण मनात थोडासा तणाव होता.
मी विचारलं आणि खोलात पाहिलं. मग उलगडलं—मुसळधार पावसात तिच्या घराचा पत्रा उडून गेला होता. ती घरातच होती आणि थोडक्यात बचावली.
आजही ती त्या तुटलेल्या घरात राहतेय, स्वतः सावरतेय, कोणाची मदत नाही.
ते सांगताना तिच्या डोळ्यात पाणी नव्हतं पण मनात अश्रू होते. ती रडत नव्हती पण मनात कुठेतरी हरवलेली होती.
मला समजलं—तिची साखर वाढलीय कारण ती आजारी आहे म्हणून नाही, तर ती stressed आहे, एकटी लढतेय म्हणून.
मी निवांत बोललो आणि ऐकलं. तिला थोडं हलकं वाटलं. शेवटी म्हणाली, “सर, पुढच्यावेळी सगळं नीट घेऊन येईन.”
हो, ती एक fighter आहे. तीच नव्हे तर अशा कितीतरी 'शांत योद्ध्या' आपल्या सभोवताली आहेत. त्या गोंधळ करत नाहीत, ओरडत नाहीत, हेल्पलाइनला फोन करत नाहीत—फक्त जगत राहतात आणि एकट्याने लढत राहतात.
आपण डॉक्टर असो, नातेवाईक, शेजारी किंवा अगदी अनोळखी, सगळ्यांच्या लढाईची कारणं कळणं शक्य नाही, पण त्या लढ्याचा आदर ठेवणं शक्य आहे.
सगळेच न सांगता येणारी लढाई लढत असतात. किमान आपण थोडं समजून घेऊया आणि थोडं नम्र राहूया. तेवढंच कधी कधी पुरेसं असतं.
डॉ. रवींद्र एल कुलकर्णी Just For Hearts