Lifestyle
OPD मध्ये बदलत चाललेली तक्रारींची भाषा
OPD मध्ये बसताना अलीकडे एक वेगळीच गोष्ट जाणवते.
पूर्वी पेशंट्स साध्या शब्दांत सांगायचे “ताप आहे”, “खोकला आहे”, “छातीत दुखतंय.”
पण अलीकडच्या दिवसांत ऐकू येणाऱ्या अनेक तक्रारी एखाद्या ठराविक आजारात बसत नाहीत.
तरीही त्या खूप कॉमन झाल्या आहेत. जणू आपल्या बदललेल्या जीवनशैलीची आणि मनावरच्या ताणाची भाषा बोलत आहेत.
OPD मध्ये वारंवार ऐकू येणारी काही वाक्यं:
1. “डॉक्टर, मेट्रोच्या 2-3 मजली पायऱ्या चढताना इतकी धाप लागते की वाटतं तिथेच बसावं.”
2. “दोन दिवस ट्रिपला गेलो… पण बाहेरचं खाल्लं की पाच दिवस पोट जडच राहतं.”
3. “घरी चार पाहुणे येऊन गेले की दोन दिवस इतका थकवा येतो की कोणाशी बोलावंसं वाटत नाही.”
4. “दिवसभर Zoom meetings… रात्री डोळे इतके त्रस्त की झोपच लागत नाही.”
5. “व्हॉट्सॲपवर कुणी काही उलट बोललं की दिवसभर डोक्यात तेच चालू राहतं.”
6. “मुलांशी बोलायला गेलं की ते चिडतात… वडिलांशी बोलायला गेलं की पटत नाही… मध्ये माझीच ओढाताण.”
7. “मित्रांमध्ये बसलो की वाटतं आपण मागे पडतोय… तेवढ्यानेच धडधड वाढते.”
8. “ऑनलाइन food apps मुळे जेवण पटकन येतं… पण वजन आणि सुस्ती हाताबाहेर जात आहेत.”
9. “छोट्या गोष्टीवरून घरी भांडण होतं… आणि मग ऑफिसमध्ये कामावर लक्ष लागत नाही.”
10. “सकाळी उठल्यावर फ्रेश वाटण्याऐवजी आधी मोबाईलच उघडतो… तिथूनच दिवसाचा थकवा सुरू होतो.”
हे सगळं ऐकताना एक प्रश्न मनात येतो:
हे आजार आहेत का… की शरीर आणि मन देत असलेले इशारे?
कदाचित आपण जास्त वेगात, जास्त स्क्रीनमध्ये, जास्त अपेक्षांमध्ये जगायला लागलोय.
आणि शरीर शांतपणे सांगतंय थोडं थांबा… थोडं संतुलन आणा.
तुम्हालाही यापैकी काही जाणवतं का? कमेंटमध्ये तुमचा अनुभव लिहा. कदाचित तुमचा अनुभव दुसऱ्या कोणाला स्वतःकडे बघायला मदत करेल.
कधी कधी बोलल्यानेच निम्मं ओझं हलकं होतं.
Dr Ravindra L Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts